नारायण राणेंनी आधी भाजप सोडावी मग विचार करू – प्रफुल्ल पटेल

नारायण राणेंनी आधी भाजप सोडावी मग विचार करू – प्रफुल्ल पटेल

मुंबई – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीसाठी 50-50 असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यातील काही जागा दोन्ही पक्ष आपल्या मित्रपक्षांना सोडणार आहेत. त्यामुळे भाजपवर सध्या नाराज झालेले नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष जर महाआघाडीत आला तर राष्ट्रवादी कोकणात राणेंना मदत करण्याची शक्यता आहे. परंतु खासदार नारायण राणे हे सध्या भाजपसोबत आहेत. त्यामुळे त्यांनी आधी भाजपची साथ सोडावी. त्यानंतर त्यांना सोबत घेण्याबाबत विचार करू, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. मुंबईत राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीबाबत बैठक झाली. त्यावेळी प्रफुल्ल पटेल बोलत होते.

नारायण राणे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची गणितं बदलली आहेत. हा मतदारसंघ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याची चर्चा आहे. या मतदारसंघासाठी नारायण राणे हे उत्सुक आहेत. त्यासाठी राणे यांनी भाजप सोडावी मग विचार केला जाईल असं पटेल यांनी म्हटलं आहे.

तसेच लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष जो उमेदवार देईल त्याला भास्कर जाधव यांनी मदत करावी, असा निर्णय राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे राणे आता पुन्हा   भाजपला सोडतील का? असा सवाल केला जात आहे.

COMMENTS