मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपध्ये अखेर युती झाली आहे. यानंतर खासदार नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. युती होणारच याचे भाकित मी सुरुवातीपासून करत होतो. लाथाडत असले तरी एकत्र येणार हे माहित होते. युती झाली मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत नव्हता असं राणे यांनी म्हटलं आहे.
तसेच स्वबळाच्या घोषणेच्या ठरावाचे काय झाले? असा सवालही त्यांनी केला आहे. एका बाजूला सत्ता उपभोगली तर दुसरीकडे एकमेकांवर टीका केली. मातोश्रीचा स्वार्थ आणि बचावासाठी ही युती केली असून युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होणार नाही, युती झाली पण मनं जुळली नसल्याचंही राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सैनिक आणि भाजपाचे कार्यकर्ते लढायला समोर ठाकले आहेत. जी साडेचार वर्षे टीका झाली त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते नाराज आहेत. युती झाल्याचे कुठेही समाधान नाही,तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना यासाठी ही युती असून या देशात सर्वात जास्त भ्रष्टाचार मुंबई महापालिकेत झाला आहे. या भ्रष्टाचाराने जमवलेले पचवायचे कसे यासाठी ही युती झाली असल्याची टीकाही राणे यांनी केली आहे. स्वबळावर लढणार म्हणून ठराव झाला, भाजपाच्या 25 मतदारसंघात शिवसेनेच्या लोकांनी लढायची तयारी केली होती, तिथे ते भाजपाला कसे मतदान करतील असंही राणे यांनी म्हटलं आहे.
तसेच माझा खासदारकीचा राजीनामा द्यायचा संबंध येत नाही. मी भाजपाचा सदस्य नाही, राजीनामा कसला देणार. मी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार नाही. त्यांनी जाहीरनामा समितीवर घेतले. आता माझा पक्ष वेगळी निवडणूक लढवणार आहे, त्यामुळे मी दोन पक्षाचे जाहीरनामे तयार करू शकत नाही. त्यामुळे मला जाहीरनामा समितीतून वगळावे यासाठी भाजपाला लेखी कळवणार असल्याचंही राणे यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात काही जागा लढवणार असून विधानसभेच्या जागाही लढवणार आहे. मी लोकसभा लढवणार नाही, विधानसभा लढवायची की नाही हे लोकसभा निवडणुकीनंतर ठरवणार असल्याचा निर्णयही राणे यांनी घेतला आहे.
तसेच महाआघाडीत जाण्याचा विचार नाही. आघाडीने पाठिंबा दिला तर मी तो घेणार. निवडणुकीत माझा प्रहार भाजपावर नसेल काही गोष्टींचा संयम मी पाळणार मला त्यांनी खासदार केले आहे. शिवसेनेला विधानसभेत यावेळी 25 जागाही मिळणार नाहीत तसेच लोकसभेत 10 जागांच्यावर जाणार नाहीत असाही अंदाज यावेळी राणे यांनी मांडला आहे.
COMMENTS