मुंबई – भाजपचे खासदार नारायण राणे यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ठाकरे सरकारवर टीका केली होती. कोरोनाचा सामना करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राणे यांनी केली होती. राणेंच्या या भूमिकेवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेनेमुळेच नारायण राणे मोठे झाले आणि ते रस्त्यावर आले, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला. शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या नारायण राणे यांना हे वागणे शोभत नाही,राणेंचे शिवसेनेशी जुने नाते आहे. शिवसेनेमुळेच ते मोठे झाले आणि शिवसेनेमुळेच रस्त्यावरही आले. त्यामुळे शिवसेनेशी त्यांचे प्रेमाचे नाते आहे असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.
दरम्यान कोरोना ही जागतिक महामारी आहे. ती महाराष्ट्राने आणली नाही. राजकारणाची ती व्यवस्था नाही. याचा सामना करण्यासाठी सर्वांनी सरकारला साथ देण्याची गरज आहे. उपाययोजनांत त्रुटी राहत असतील तर त्या लक्षात आणून दिल्या पाहिजेत, परंतु असं न करता राज्यपालांकडे जाऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणे योग्य नसल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल तर महाराष्ट्रासोबत गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्लीतही लागू करावी. इतर राज्यांमध्येही ती लागू केली पाहिजे. कोरोनाच्या आपत्तीला राजकारणाचा रंग न देता समाजसेवेच्या माध्यमातून, प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या आपत्तीवर मात कशी करता येईल? या दृष्टीने सूचना त्यांनी द्याव्यातस असंही पाटील म्हणालेत.
COMMENTS