नाशिक – आगामी लोकसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीची नवी खेळी पहायला मिळू शकते. गेल्या तीन टर्मपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. 2014 मधील निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे हरीश्चंद्र चव्हाण निवडून आले होते. परंतु यावेळी मात्र चव्हाण यांना हरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांचा येवला आणि त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळांचा नांदगाव विधानसभा मतदारसंघ दिंडोरीतच येतो. त्यामुळे या मतदारसंघात भुजबळ कुटुंबियांचं वर्चस्व पहायला मिळत आहे.
दरम्यान या मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी आणि माकप अशा नव्या समीकरणांची शक्यता आहे. असं झालं तर माकपचे जे. पी. गावित यांना इथे संधी मिळू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. असं झालं तर आदिवासी बहुल भागातील मतदान विभागलं जाऊ शकतं आणि याचा थेट फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ही खेळी खेळली जाऊ शकते असं बोललं जात आहे.
या मतदारसंघात भाजपचे खासदार हरीश्चंद्र चव्हाण यांच्यावर मतदारांची नाराजी पहायला मिळत आहे. कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी सरकारवर नाराज आहेत. अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलं नाही, तर अनेकांना नुकसान भरपाई देखील मिळालेली नाही. मतदारसंघात रस्त्याची समस्या कायम आहे.
अनेक भागात आजही खडतर रस्ते आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर असल्याने तरुण वर्ग व्यसनाधीन होत असून मतदारसंघात एकही मोठा प्रकल्प अथवा उद्योग आलेला नाही. काही दिवसांपूर्वी खासदारांच्या परिवारातील लोकांकडून कार्यकर्त्यांना धमकवण्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत चव्हाण यांना याचा मोठा फटका बसू शकतो असं बोललं जात आहे.
COMMENTS