नाशिक – राज्यातील सत्ता जाताच भाजपच्या बालेकिल्ल्यात बंडाळीच ग्रहण लागलं असल्याचं दिसत आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्य निवडीवरून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात राडा झाला. भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्याने नगरसेविका प्रियांका घाटे यांच्या समर्थकांनी गोंधळ घालत पक्षाकडे राजीनामा दिला तर शिवसेनेत पूनम मोगरे यांना संधी न मिळाल्याने त्यांच्याही सदस्यांनी गोंधळ घातला. तसेच नगरसेवक पुंडलिक खोडे हे देखील नाराज असल्यामुळे भाजपमधील अंतर्गतवाद चव्हाट्यावर आला आहे.
दरम्यान स्थायी समितीचे आठ सदस्य 29 फेब्रुवारीस निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी 8 नवे सदस्य नियुक्त करण्यासाठी विशेष महासभा आज महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी भाजपाकडून हेमंत शेट्टी, सुप्रिया खोडे, वर्षा भालेराव, शिवसेनेकडून सत्यभामा गाडेकर आणि सुधाकर बडगुजर तर काँग्रेसकडून राहुल दिवे तसेच राष्ट्रवादीकडून समीना मेमन यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
परंतु उमेदवारी न मिळाल्याने प्रियंका घाटे यांचे बंधू रोशन घाटे यांनी सभागृहाबाहेर गोंधळ घातला आणि विशिष्ट समाजाला डावलले जात असल्याचा आरोप केला.त्यानंतर अंतर्गत वादामुळे ही सभा तहकूब करण्यात आली.
COMMENTS