नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरुन संघर्ष

नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरुन संघर्ष

नवी मुंबई: नवी मुंबईतील विमानतळाच्या नामांतराचा वाद आगामी काळात चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेने या विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. तर भाजपने लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याची मागणी रेटली आहे. त्यामुळे ठाकरे की पाटील? या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या समोर उभे ठाकण्याची चिन्हे दिसत आहेत.

स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबई विमानतळाला शेतकरी व कामगार नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. नवी मुंबईतील कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला पाटील यांचं नाव देण्यात आलेलं नाही. नवी मुंबईची उभारणी करताना सिडकोने सक्तीने जमिनी संपादित केल्या होत्या. भूमिपुत्रांना या जमिनींचा योग्य मोबदला मिळावा म्हणून दि. बा. पाटील यांनी मोठा लढा उभारला होता. त्यामुळे या विनातळाला त्यांचे नाव देणं योग्य होईल. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचाही पाटलांच्या नावाला विरोध नसेल, असं सांगतानाच नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरात राजकारण होऊ नये, असं आवाहन ठाकूर यांनी केलं आहे.

तर, या आधीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली होती. बाळासाहेबांचं योगदान सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांच्या गौरव म्हणून या विमानतळाला त्यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी शिंदे यांनी केली होती.

COMMENTS