मुंबई – पालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली असल्याचं पहावयास मिळत आहे. या निवडणुकांच्या प्रचारसभेदरम्यान एकमेकांवर जोरदार आरोप केले जात आहेत. भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत साम-दाम-दंड-भेदाचा वापर करुन पोटनिवडणूक जिंकण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असून शासकीय नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न संबंधित यंत्रणेकडून केला गेला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.तसे हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आणि भाजपला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. निवडणूकीची आचारसंहिता जाहीर झाल्यावर सरकारी पैसे वाटता येत नाहीत. परंतु निवडणूक जिंकता येत नसल्याचे लक्षात आल्यामुळेच भाजपकडून हा प्रकार करण्यात आला असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.
दरम्यान भंडारा-गोंदियामध्ये सहा महिन्यापूर्वी झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई निवडणूक आचारसंहिता काळात ट्रेझरीमध्ये जमा करुन मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचंही यावेळी मलिक यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची विरोधकांनी विधानसभेत मागणी केल्यानंतर ही नुकसान भरपाई देण्याचे सरकारने मान्य केले होते. मात्र सहा महिने उलटून गेले तरी ही नुकसान भरपाई देण्यात आली नव्हती. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला होता त्यामुळेच सरकारकडून भंडारा-गोंदिया निवडणूक कालावधीत अचानक ही नुकसानभरपाईची रक्कम ट्रेझरीमध्ये जमा केली असल्याचा आरोपही यावेळी मलिक यांनी केला.
COMMENTS