मुंबई – देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करून 80 तासात केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवल्याचा दावा भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केला आहे. या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकमध्ये निवडणूक असताना मतं मिळवण्यासाठी हेगडे असं वक्तव्य करत आहेत. पैसे पाठवून परत घेण्याची तरतूद कोणत्या नियमात आहे, असं मला वाटत नाही. असं झालं असेल तर नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल. भाजपवाले लबाड आहेत, मतं मिळवण्यासाठी अशाप्रकारे बोलतात असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान फडणवीस यांनी अजित पवार यांच्या पाठिंब्याने शपथ घेतली तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे केंद्राचा 40 हजार कोटींचा निधी होता. जर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सत्तेत आले असते तर त्यांनी 40 हजार कोटींचा गैरवापर केला असता. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर येऊन त्यांनी केंद्राचा निधी परत पाठवल्याचं अनंत कुमार हेगडे यांनी म्हटलं आहे. हा आरोप फडणवीस यांनी फेटाळला आहे.
COMMENTS