पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पवार कुटुंबामध्ये ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन मतभेद असल्याचं दिसत आहे. ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यांत भाजपचा पराभव झाला नसता. त्यामुळे ईव्हीएमविषयी माझ्या मनात शंका नसल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे.तसेच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देखील ईव्हीएमवर शंका घेतली होती. परंतु अजित पवार यांनी आज केलेल्या या वक्तव्यामुळे ईव्हीएमवरुन पवार कुटुंबात मतभेद असल्याचं दिसत आहे.
दरम्यान बारामतीची जागा जिंकण्याचा भाजप सातत्याने दावा करत आहे. ईव्हीएम छेडछाडीच्या आधारे तर भाजपकडून असा दावा करण्यात येत नाही ना?’ अशी शंका शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. त्याचबरोबर देशभरातील विरोधकांनी ईव्हीएमबाबत शंका घेत थेट कोर्टाचेही दरवाजे ठोठावले आहेत. परंतु अजित पवार यांनी आज ईव्हीएमला क्लिनचीट दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
COMMENTS