मुंबई – सध्या राज्यात औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करावे, या मागणीसाठी महाविकास आघा़डीमधील घटक पक्षांमध्ये मतभेद आहे. राज्याचे राजकारण तापले असताना राष्ट्रवादी काॅंग्रेसने पहिल्यांदाच आपली भूमिका जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी नामांतर हा महाविकास आघाडीचा समान कार्यक्रमाचा भाग नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
सध्या महाराष्ट्रात औरंगाबाद शहराचे नामांतर करून संभाजीनगर करावे, यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्यास महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद आहेत. भाजप व मनसेने शिवसेनेच्या मागणीस पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काॅंग्रेसने विरोध केल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही अप्रत्यक्षरित्या विरोध दर्शवला आहे.
नवाब मलिक म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारकाने कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्यावतीने महिलांना ३० टक्के आरक्षणाचा मुद्दा हाती घेतला आहे. याच्या माध्यमातून महिला उद्योजिकांची संख्या वाढण्यासाठी मदत होणार आहे. यावेळी त्यांना नामांतराबाबत प्रश्न विचारला असता महाविकास आघा़डी सरकार समान कार्यक्रमाचा अजेंडा ठेवला होता. त्यामध्ये नामांतराचा समावेश नव्हता. जर कोणी हा मुद्दा उपस्थित करीत असेल तर तो त्या पक्षाचा अधिकार आहे. त्यांनी तो करावा. पण हा महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावरील विषय नाही, अशी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.
COMMENTS