शिवसेनेच्या त्या ऐतिहासिक वाक्याला राष्ट्रवादीकडून श्रद्धांजली!

शिवसेनेच्या त्या ऐतिहासिक वाक्याला राष्ट्रवादीकडून श्रद्धांजली!

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपनं युतीची घोषणा केली आहे. यावरुन आता विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. शिवसेनेनं काही झालं तरी युती करणार नसल्याचं अनेकवेळा म्हटलं होतं. अनेकवेळा भाजपवर टीकाही केली होती. परंतु हे सगळं विसरु दोन्ही पक्ष एकत्रित आले आहेत. नेमकी याचीच आठवण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं शिवसेनेला करुन दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने बॅनरबाजी करत ‘आम्ही सत्तेला लाथ मारु’ या वाक्यालाच आदरांजली वाहिली आहे. भाजपाशी युती करताच शिवसेनेला राजीनामा खिशात, सत्तेला लाथ मारु या वाक्यांची आठवण करुन देत सोशल मीडियावर टोले लगावण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देखील ‘आम्ही सत्तेला लाथ मारू’ या ऐतिहासिक वाक्याला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. शिवसेना भवन आणि मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत.

दरम्यान  शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने अखेर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी युतीची घोषणा केली. लोकसभेसाठी शिवसेनेला २३ आणि भाजपला २५, तर विधानसभेसाठी मित्रपक्षांच्या जागा सोडून उरलेल्या जागांचे समसमान वाटप, या तत्त्वावर युती झाली आहे.त्यावरुन आता शिवसेना भाजपवर टीका केली जात आहे.

COMMENTS