पुणे – पिंपरी- चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाची पद्धत कशी असते हे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही याचे अनुकरण करावे, असा सल्ला दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कसा प्रचार करतात, हे लक्षात घ्या असं पवारांनी म्हटलं आहे. पाच घरांमध्ये भेटायला गेले आणि यातील एक घर बंद असेल तर ते संध्याकाळी पुन्हा त्या बंद घरात जातात. संध्याकाळीही ते घर बंद असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या घरात जातात, पण काहीही झालं तरी ते त्या घरातील सदस्यांशी संपर्क साधतातच. त्यांच्या काही गोष्टी आपल्याला पटणार नाहीत पण जे चांगलं आहे ते घ्यायला हवं. ही चिकाटी आपल्या कार्यकर्त्यांनीही शिकावी,” असा सल्ला शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
दरम्यान पदाधिकाऱ्यांनी आजपासून एक निर्णय घ्यावा, प्रत्येकाला जो भाग वाटून दिला आहे त्या भागातील नागरिकांशी संपर्क साधा, घरोघरी भेट द्या. मतदारांकडून सविस्तर माहिती घ्या. यामुळे मतदार असं म्हणणार नाही की निवडणुकीतच तुम्हाला आमची आठवण येते. तसेच विधानसभेला कार्यकर्त्यांशी चर्चा करून उमेदवार ठरवा, नवीन चेहरे द्या असा चिमटा शरद पवार यांनी प्रस्थापितांना दिला आहे. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये तीन ही जागा आल्या पाहिजेत, आतापासूनच कामाला लागा अशा सूचनाही पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
तसेच यावेळी पवार यांनी धर्माचा अभिमान असावा तो घरात असावा, सार्वजनिक कार्यक्रमात असेल तर ठीक आहे, पण तो राज्यकारभाराचा भाग नसावा, आज काल धर्माच्या नावावर मते मागितली जातात हे चुकीचे असल्याचे म्हणत शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथमधील ध्यान धारनेवर टीका केली आहे.
COMMENTS