‘त्या’ भाजप नेत्याच्या घरात लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी काँग्रेसच्या परंपरागत जागेवर राष्ट्रवादीची मागणी !

‘त्या’ भाजप नेत्याच्या घरात लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी काँग्रेसच्या परंपरागत जागेवर राष्ट्रवादीची मागणी !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपला घरचा रस्ता दाखवण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीनं महाआघाडीची निर्मिती केली आहे. या महाआघाडीची राज्यात जोरदार चर्चा आहे. परंतु काही ठिकाणच्या जागावाटपावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचं घोडं अजूनही अडलं असल्याचं दिसत आहे. लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. परंतु उर्वरित 8 जागांपैकी काही मित्रपक्षांना सोडल्या जाणार आहेत तर काही जागांची सहमतीने अदला- बदली करण्याची मागणी आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. यामध्ये एकमेकांच्या परंपरागत जागांचाही समावेश आहे.

आदिवासी बहुल व काँग्रेसचा परंपरांगत मतदारसंघ असलेल्या नंदुरबार लोकसभा जागेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.सध्या भाजपमध्ये असलेले विजयकुमार गावीत हे राष्ट्रवादीत पुन्हा ‘घरवापसी’ करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी राष्ट्रवादीने ही जागा देण्याची मागणी केली असल्याची माहिती आहे.

दरम्यान 2014 मध्ये राष्ट्रवादीचे नेते डॉ. विजयकुमार गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत त्यांची मुलगी हिना गावीत यांनी विजयही मिळवला. परंतु गावित यांना अपेक्षित असलेले मंत्रिपद भाजपने न देता मूळ भाजपचे व निष्ठावंत नेते विष्णू सावरा यांना आदिवासी मंत्रालयाचा कारभार दिला.

गावित तेव्हांपासून भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे ते पुन्हा राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा आहे. खुद्द गावित सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे समोर येत आहे. तसे नसते तर राष्ट्रवादीने काँग्रेसची परंपरांगत नंदुरबार लोकसभेची जागा मागितलीच नसती असं बोललं जात आहे. त्यामुळे काँग्रेस ही जागा राष्ट्रवादीला सोडणार का हे पाहणं गरजेचं आहे.

 काँग्रेसची परंपरागत जागा

सध्या नंदुरबार मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. मात्र, 2019 साठी राष्ट्रवादीने नंदुरबार मतदारसंघाची मागणी करत काँग्रेसची कोंडी केली आहे. 1957, 1962 आणि 2014 चा अपवाद वगळता स्वातंत्र्यानंतर झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने एकहाती विजय मिळवला. काँग्रेसचे माणिकराव गावित 1981 पासून सलग 9 वेळा नंदुरबारमधून लोकसभेवर निवडून गेले.

COMMENTS