पुणे – पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेविकेने बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्यास धमकावल्याचा प्रकार बुधवारी घडला. यावेळी नगरसेविकेच्या पतीने आणि कार्यकर्त्यांनी अधिकार्यास अरेरावी केली. तर एका कार्यकर्त्यांने या अधिकार्याच्या कार्यालयातील खुर्चीला लाथही मारली. या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक चक्क कमांडोच्या वेशात पालिका सभागृहात अवतरले. घडलेल्या प्रकाराचा खुलासा करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली.
महापालिकेच्या बांधकाम विभागातील एका अधिकार्याकडे बुधवारी भाजपच्या एक नगरसेविका काही कामानिमित्त आल्या होत्या. यावेळी त्यांच्या समवेत पती आणि कार्यकर्ते होते. एका कामावरुन संबधित अधिकारी आणि नगरसेविका यांच्यामध्ये वाद झाला. त्यामुळे संबधित नगरसेविकेने या अधिकार्यास दमदाटी केली. तर नगरसेविकेच्या पतीने आणि कार्यकर्त्यांनी या अधिकार्यांला अरेरावी केली. यातील एका कार्यकर्त्यांने संबंधीत अधिकार्याच्या कार्यालयातील खुर्चीला लाथ मारली. यावेळी कार्यालयात मोठयाप्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होती.
शहरातील एकात्मिक सायकल धोरण आणि सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य उपविधीस मान्यता देण्यासाठी गुरूवारी महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती. नगरसेविकेने अधिकाऱ्यास धमकावल्याच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे आणि भैय्या जाधव हे चक्क कमांडोच्या वेशात पालिका सभागृहात अवतरले. यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घडलेल्या प्रकाराचा खुलासा करण्याची मागणी केली. मात्र खुलासा न करताच ही सभा 14 डिसेंबरपर्यंत तहकुब करण्यात आली.
COMMENTS