बाजीगर म्हणून जबाबदारी निभावलेले  धनंजय मुंडे व्हिलन कसे?

बाजीगर म्हणून जबाबदारी निभावलेले धनंजय मुंडे व्हिलन कसे?

परमेश्वर गित्ते, मुंबई – शनिवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती राजवट हटवून भल्या पहाटे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे स्वारीवर आले. माध्यम जगतांच्या बातम्यांवर महाराष्ट्र विश्वास ठेविनासा झाला. कारण बातमीच तशी धक्कादायक होती. अनपेक्षित घटनाक्रम घडला होता. जे कधीही घडणार नाही. असं घडलं होतं. अजित पवार हे फडणवीसांच्या संगतीला जाऊन उपमुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्राला पटत नव्हतं. शिवाय रात्रीतून राष्ट्रपती राजवट हटवून देवेंद्र आणि अजित पवार हे सत्तास्थानी आलेली बाब. महाराष्ट्राला मान्य नव्हती. कारण 22 नोव्हेंबरच्या रात्री 11 पर्यंत अजित पवार महाविकास आघाडीच्या सोबत होणार्‍या सर्व घटनाक्रमाचे साक्षीदार आणि प्रत्यक्ष सहभागीदार होते. पहाटे जी बातमी आली. ती धक्कादायक होती. परंतु खा. शरदचंद्र पवारांचा तो खेळीचा भाग होता हे नंतर स्पष्ट झाले. परंतु या खेळीतील महत्त्वाचे शिलेदार राहिलेले धनंजय मुंडे मात्र या काळात व्हिलनच्या भूमिकेत दिसू लागले. लोकांनी त्यांना फोनद्वारे संपर्क करून वेगवेगळ्या शब्दप्रमाणामध्ये विनंती केली. आज सर्व काही सुरळीत आहे. अजितदादा शरद पवारांच्या सोबत आहेत, धनंजय मुंडे देखील सोबत आहेत. परंतु त्यांच्या नावाला लागलेला जो व्हिलनचा ठप्पा आहे. तो निघायला तयार नाही. धनंजय मुंडे हे या खेळातील शातिर बाजीगर होते. त्यांच्या सहकार्याने देवेंद्र सरकार बर्‍याच अंशी कोसळल्याचे दिसले. परंतु या खेळामध्ये धनंजय मुंडे व्हिलन ठरले. ही ओळख पुसली पाहिजे आणि त्यासाठी शरदचंद्र पवार यांनी पुढाकार घेतला पाहिजे.

सत्ता येईल, सत्ता जाईल. परंतु ओळख माणसाची प्रतिष्ठा आणि पत वाढवत असते. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाचा व कर्तृत्वाचा विचार करून पक्षप्रमुखांनी अर्थात शरदचंद्र पवारांनी त्यांच्या खेळीचा सर्वभाग महाराष्ट्रासमोर मांडावा आणि धनंजय मुंडे यांच्यासारख्या काम करणार्‍या नेतृत्वाचा चेहरा हा अधिक सुस्पष्ट करावा. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेला महिना हा पूर्ण अस्वस्थता होती. अनेक अनपेक्षित घडामोडी घडत होत्या. परंतु त्या दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी संयुक्तपणे महाराष्ट्रात सत्ता स्थापण्याचा निर्णय केला. तो निर्णय अंतिम टप्प्यात असतांना अजित पवारांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या कळपात जाऊन त्यांना सत्ता स्थापण्याची गळ घातली. फडणवीसांनी सत्तेच्या धुंदीपुढे कशाचाही विचार न करता हो भरला आणि रात्रीतून राष्ट्रपती राजवट हटवून मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर झाले आता देवेंद्र हटणार नाहीत. बहुमत सिद्ध करतील इथपर्यंत चर्चांचा भडीमार होऊ लागला. भाजपचे नेते आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांनी तर सर्व मर्यादा सोडल्या. वाट्टेल तसे बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. त्यावेळी सर्व काही ठप्प झाले. अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द करून आपला घरचा रस्ता धरला. त्या खालोखाल मुख्यमंत्र्यांनीही दोन तासांनंतर आपला राजीनामा सादर केला. हा सर्व घटनाक्रम घडल्यानंतर जे काही गुपीत होते. ते बाहेर येऊ लागले. त्याला पुष्टी मिळू लागली. जे अजित पवार नाराज होऊन पक्ष सोडू शकतात ते अजित पवार एकटेच देवेंद्रांच्या दरबारात कसे जाऊ शकतात? जर आमदारांचा गटच फोडायचा होता तर रात्रीतून 30 आमदार त्यांनी विमानांनी परप्रांतात सुरक्षित ठिकाणी नेले असते. परंतु त्यांना देवेंद्राच्या माध्यमातून राष्ट्रपती राजवट हटवून महाविकास आघाडीची सत्ता निर्माण करावयाची होती. म्हणून हा खेळीतील भाग होता. हे उघड झाले. कुठल्याही परिस्थिती राष्ट्रपती राजवट हटली नसती. जी काळ्या दगडावरील पांढरी रेषा आहे. त्यासाठी कथित गेम रचण्यात आला. त्यात देवेंद्र फडणवीस सत्तेच्या मोहापायी अडकले आणि राष्ट्रपती राजवट चुटकीसरशी बाजूला झाली आणि त्याच दरम्यान महाविकास आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा करून आपली सत्ता काबिज केली.

त्यानंतर त्याच दिवशी अजित पवारांनी थेट शरद पवारांचे निवासस्थान गाठून रात्रंभर चर्चा केली आणि मिशन फत्ते झाल्याचे सिद्ध झाले. दरम्यानच्या काळात म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्री असतांना त्यांना राष्ट्रवादीची सर्व टीम भेटत होती, बोलत होती, संवाद साधत होती. तरी देखील फडणवीसांना शंका आली नाही. शिवाय ज्या दिवशी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळी अजित पवार समर्थक आमदारांनी थेट शरदचंद्र पवारांच्या दरबारात येऊन आपली फसवणूक झाल्याचे सांगितले. परंतु या सर्व घटनाक्रमामध्ये धनंजय मुंडे नॉट रिचेबल होते. सर्व आमदार त्यांच्या बंगल्यावर बोलावले होते. शिवाय एकाकी शरद पवारांसोबत धनंजय मुंडे दिसले नाहीत म्हणून महाराष्ट्रात त्यांच्या नावाने शिमगा घालण्यात येत होता. सोशल मीडियामध्ये त्यांना टार्गेट करण्यात येत होते. दुपारी चारच्या बैठकीला धनंजय मुंडे हजर झाले. त्या ठिकाणचा रोष पाहिला तर लोकांमध्ये प्रचंड संताप होता. त्यानंतर धनंजय मुंडे आणि शरदचंद्र पवार या उभयतांची साधारणतः दोन तास बैठक झाली. एकूणच धनंजय मुंडे हे त्या खेळीतील महत्वाचे खेळाडू होते. त्यामुळे त्यांना सामान्य मतदारांच्या आणि विशेषतः मतदार संघातील मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आज मतदारसंघातील रोष थोडाबहुत कमी झाला असेल परंतु त्यांना जो ठपका लागला आहे. तो पुसण्याची गरज आहे आणि हे काम केवळ आणि केवळ शरदचंद्र पवार करू शकतात.

त्यांच्याच खेळीचा हा भाग होता. त्यामुळे या खेळातील एक खेळाडू धनंजय मुंडे होते. त्यामुळे आज सत्ता स्थापन झाली. उद्या धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळेल. पालकमंत्रीपद मिळेल परंतु त्यांच्या नावासंदर्भातील जो अविश्वास निर्माण झाला आहे. तो विश्वासामध्ये बदलण्याची ताकद शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात आहे. आणि ते काम त्यांनी करावे. आज जी प्रतिमा व्हिलन म्हणून केलेली आहे. ती प्रतिमा बदलण्याची गरज आहे. अन्यथा काम तो कोई और गया। हम तो सिर्फ बदनाम हुए। अशी अवस्था होऊ नये, कारण मिशनमध्ये काम करणारे अनेक असतात. त्यामुळेच एखादी मोहिम फत्ते होत असते. त्यावेळी त्याच्या प्रमुख सुत्रधाराचे नाव पुढे येते. परंतु त्याच्या पाठिशी असलेले सर्व सैन्य हे एक तर तुडवले जाते किंवा सडवले जाते. त्यामुळे मुंडे यांच्या नेतृत्वाचा विचार करून तात्काळ शरदचंद्र पवारांनी याबाबतीत विचार करून त्यांच्या भूमिकेविषयी व कार्य प्रणालीविषयी व्यक्त व्हावे, अशी अपेक्षा आहे!

लेखक अंबाजोगाई येथील दै. वार्ता या वृत्तपत्राचे संपादक आहेत.

COMMENTS