मुंबई – धनगर समाजातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाला किमान दोन लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याची मागणी या नेत्यांनी पवारांकडे केली आहे. यावेळी शरद पवार यांनी देखील निर्धार परिवर्तन यात्रा संपताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार व उर्वरित प्रमुख नेत्यांसमवेत चर्चा करून धनगर समाजाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी देता येईल याची चाचपणी करून योग्य निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून दोन लकोसभा मतदारसंघात धनगर समाजाच्या नेत्याला उमेदवारी मिळेल असं बोललं जात आहे.
या बैठकीला शरद पवारांसह धनगर समाजातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे, आमदार रामराव वडकुते, प्रकाश शेंडगे, विश्वासराव देवकते, मदन देवकते, डॉ. शशिकांत तरंगे, रमेश पाटील, सक्षणा सलगर, किशोर मासाळ, डॉ. शिवाजी राऊत, बाळासाहेब बंडगर, हरिभाऊ शेळके, दादासाहेब चोरमले, पोपटराव गावडे, दत्ता बंडगर, सर्जेराव काळे, अशोक हटकर आदी नेते उपस्थित होते.
दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे यांनी मागील आठवड्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांना एक पत्र लिहून आगामी लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाला दोन लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याची मागणी केली होती. तसेच धनगर समाजातील नेत्यांसोबत एका बैठकीचे आयोजन करावे अशी विनंती केली होती. पवार यांनी तत्काळ दखल घेऊन आमदार रामराव वडकुते यांच्या नेतृत्त्वाखाली काल मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्यभरातील पक्षातील धनगर समाजातील् नेते, पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली.
या बैठकीत धनगर समाजातील नेत्यांनी पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कोट्यातील किमान दोन लोकसभा मतदारसंघात उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. धनगर समाजाची लोकसंख्या ही प्रामुख्याने सांगली, माढा, बारामती, परभणी, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, नगर आदी लोकसभा मतदारसंघात आहेत. यापैकी किमान दोन लोकसभा मतदारसंघात तरी धनगर समाजाला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली पाहिजे.
राष्ट्रवादीने धनगर समाजाला उमेदवारी दिल्यास समाजात योग्य संदेश जाऊन पक्षाला राज्यातील उर्वरित लोकसभा मतदारसंघात त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तसेच धनगर समाजाचा लोकसभेत पहिला खासदार पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमान मिळवावा. अशी मागणी या नेत्यांनी पवारांकडे केली आहे. यावर पवारांनी लवकरच पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा करून मार्ग काढू अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून जर धनगर समाजातील नेत्यांना दोन लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली तर कोणत्या नेत्याला लोकसभेसाठी संधी मिळणार आणि कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS