मुंबई – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना-भाजपवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या मागे भाजपा आणि शिवसेना विशेषतः भाजपा मोठ्या प्रमाणावर लागली आहे. सर्व मार्गांचा अवलंब करून आमचे नेते खेचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वेगवेगळी भीती दाखवून आणि दडपण आणून हे प्रयत्न सुरू आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकशाही निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजपाला मतदान केलं असतानाही त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची गरज का लागते असा प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान एवढी सत्ता असताना दुसर्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा राज्यातील विविध प्रश्नांवर लक्ष केंद्रीत केलं असतं तर राज्यातील जनतेने यांना आशीर्वाद दिला असता. दुसर्याचे पक्ष फोडून आपला पक्ष मजबूत करण्याची वेळ भाजपावर येते म्हणजे भाजपा किती कमजोर आहे हे दिसते. जाताना वेगवेगळी कारणं वेगवेगळी लोक देतायत. सत्तेचा आशिर्वाद असावा, आपण राजकीयदृष्ट्या जिवंत रहावं असा काही जणांचा प्रयत्न आहे. राज्यात असे जेव्हा जेव्हा पक्ष बदलण्याचं काम झालं त्यांना जनतेने धडा शिकवला असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS