गडचिरोली – जिल्ह्यातील जांभुळखेडा-लवारी गावादरम्यान करण्यात आलेल्या भूसुरुंग स्फोटाप्रकरणी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कैलास रामचंदानी असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. १ मे रोजी जाभूळखेडा-लवारी गावादरम्यान भूसुरुंगस्फोट घडवून आणला होता. यात १५ पोलीस आणि एक खासगी वाहनचालक शहीद झाले होते. याप्रकरणी नक्षल्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोची प्रमुख नर्मदाक्का आणि तिचा पती किरणकुमार यांना अटक केली होती. त्यांनंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरुन तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांवरुन पोलिसांनी वेगवेगळ्या दिवशी दिलीप हिडामी, परसराम तुलावी, सोमनाथ मडावी, किसन हिडामी आणि सुकरु गोटा या पाच जणांना अटक केली होती. या सर्वांची अधिक चौकशी केली असता कैलास रामचंदानी याचं नाव समोर आलं आहे.
दरम्यान कैलास रामचंदानीचे कुरखेडा येथे इलेक्ट्रिकल तसंच इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान असून, गेल्या काही महिन्यांपासून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कुरखेडा तालुक्याचा प्रमुख पदाधिकारी आहे. या स्फोटात त्याचा हात असल्याचा ठोस पुरावा पोलिसांच्या हाती आला असून यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. भूसुरुंगस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यात राष्ट्रवादीचा पदाधिकारी अडकल्याने राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे.
COMMENTS