सोलापूर – पंढरपूर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोनामुळे राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राजूबापू पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तिघांचे निधन झाले आहे. दहा दिवसात पाटील यांच्या कुटुंबातील तिघांचं निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. राजूबापू पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूरला नेण्यात आले होते, मात्र आज पहाटे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाटील यांच्या कुटुंबातील चुलते, धाकटे बंधू महेश पाटील आणि आता राजूबापू यांचाही मृत्यू झाला आहे.राजूबापू पाटील यांच्या निधनाने राजकीय नेत्यांपासून समर्थकांनी शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान राजूबापू पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी मानले जात.शरद पवार यांच्या शिफारशीवरुन आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी राजूबापू पाटील यांची नियुक्ती झाली होती. यापूर्वी त्यांचे वडील यशवंतभाऊ पाटील यांनीदेखील तब्बल 49 वर्ष रयत शिक्षण संस्थेचे सदस्यपद भूषवले होते.तसेच त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाच्या माध्यमातून ठसा उमटवला होता. नुकताच गूळ कारखाना काढून त्यांनी ऊस उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
COMMENTS