पुणे – विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. परंतु तरीही राष्ट्रवादी काँग्रेसमधील गळती सुरुच आहे. वडगाव शेरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बापू पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 2014 मधील विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून पक्षानं आपल्याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार पठारे यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर पठारे यांनी सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.वडगाव शेरीचे विद्यमान आमदार तसेच भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक यांच्यासह मुंबईला गेले होते.
दरम्यान पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत होते. ते महापालिकेचे माजी नगरसेवकही आहेत. बापू पठारे भाजपमध्ये आल्यानं वडगाव शेरीमधील भाजपची ताकद वाढली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
विद्यमान आमदार रामराव वडकुतेंचा भाजपात प्रवेश
राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार रामराव वडकुते यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वडकुते यांनी आज संकल्पपत्र जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काहीच करण्यात न आल्याचा आरोप वडकुते यांनी केला आहे. वडकुते यांना हिंगोली विधानसभेतून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी आज राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे.
COMMENTS