पुणे – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का बसला असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते मच्छिंद्र तापकीर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. परंतु मच्छिंद्र तापकीर यांनी दिलेला राजीनामा पक्षनेतृत्वानं अजून स्वीकारला नसल्याची माहिती आहे.
दरम्यान गेली दहा वर्षांपासून मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला संपूर्ण वेळ दिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाचे मनापासून काम केले.तसेच माझी पक्षात कोणावरही नाराजी नसून मी व्यक्तिगत कारणासाठी राजीनामा देत आहे. तसेच भविष्यात कोणत्या पक्षात जायचे याबाबत मी अजून काही ठरवलेले नसल्याचंही तापकीर यांनी म्हटलं आहे. परंतु ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.
मच्छिंद्र तापकीर यांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केले आहे. काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीत नगरसेविका होत्या. शहरात त्यांचा मोठा जनसंपर्क असून त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे.
COMMENTS