मुंबई – काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक या तसेच काँग्रेसचे नेते कालिदास कोळंबकर यांनी आज भाजपात प्रवेश केला. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील आणखी काही नेते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये कोल्हापुरातीलही माजी मंत्री भरमू सुबराव पाटील यांच्यानंतर येत्या दहा दिवसात जिल्ह्यातील अनेक तालुका पातळीवरील नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच २८ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान धनंजय महाडिक यांना कोणती जबाबदारी द्यायची याबाबत अजून निर्णय झाला नसल्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश लांबला असल्याचं बोललं जात आहे. येत्या २८ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात जाणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत माजी खासदार महाडिक भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असूम भरमू पाटील हे महाडिक गटाचेच आहेत. आणखी काही महाडिक समर्थक त्या दिवशी हातात ‘कमळ’ घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे.
COMMENTS