मुंबई – अजित पवार यांनी बंडखोरी करत आज भाजपला पाठिंबा दिला. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे अजित पवार यांच्यावर कारवाई करत शरद पवार यांनी त्यांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची विधिमंडळ पक्षनेते पदी निवड करण्यात आली असल्याची माहिती आहे.
दरम्यान आज सकाळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे अजित पवार यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची चर्चा आहे. या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांचं मन वळवण्याचा जोरदार प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे.
अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादीचे 3 दिग्गज नेते त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. अजित पवार यांची परत घरवापसी करण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे तीन नेते अजित पवार हे थांबलेल्या ब्राइटन इमारत इथं गेले होते. यावेळी सर्व नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. मात्र अजित पवार आपल्या निर्णयावर ठाम असून त्यांनी आमदारांच्या मार्फत शरद पवारांना एक निरोप पाठवला.
राष्ट्रवादीत फूट पडू द्यायची नसेल तर पक्षाने भाजपला पाठिंबा द्यावा, असा निरोप अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासाठी पाठवला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यांना यश आलं नसल्याचं दिसून आलं आहे.
COMMENTS