मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. निवडणूक तोंडावर आल्यामुळे उमेदवार निश्चितीसाठी पक्षांकडून चाचपणी सुरु आहे. काही ठिकाणचे उमेदवार निश्चितही झाले आहेत. काँग्रेस –राष्ट्रवादी आघाडीमधील जागा वाटपाचा तिढाही सुटला असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आपले काही उमेदवार निश्चित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकूण 8 उमेदवारांच्या नावं निश्चित केली असल्याची माहिती आहे.
दरम्यान या यादीमद्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली आहे. साता-यातून उदयनराजे भोसले, कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती आहे.
तसेच माढातून विजयसिंह मोहिते पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार असून गोंदिया – भंडा-यातून मधुकर कुकडे, बारामतीतून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. तसेच शिरुरमधून विलास लांडे यांच्या नावाची चर्चा, तर मावळमधून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे. बुलढाण्यातून राजेंद्र शिंगणे यांचे नाव निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
COMMENTS