मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीकडून काही उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. परंतु सध्या राष्ट्रवादीकडून माढा लोकसभा
मतदारसंघात उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेत माढा लोकसभा उमेदवारीबाबत संकेत मिळतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांना होती. परंतु या सभेत पक्षाच्या नेत्यांनी कोणतेही स्पष्ट संकेत दिले नाहीत त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारीचा गुंता वाढला असल्याचं दिसत आहे.
दरम्यान या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचं नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेदरम्यान अकलूज वगळता इतर सर्वच कार्यक्रमात प्रभाकर देशमुख राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाडीत फिरल्याने त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. याचबरोबर माढा लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगत त्यांनी मतदारसंघातील दौरे आणि गाठीभेटी देखील सुरु केल्या आहेत.
तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील हे माढ्याचे विद्यमान खासदार आहेत. परंतु त्यांची गेली पाच वर्षांपासून भाजपशी जवळीक वाढल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार का याबाबत संभ्रम आहे. त्याचबरोबर माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि त्यांचे बंधू जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे हे मोहिते पाटील यांचे कडवे विरोधक आहेत. त्यामुळे मोहिते पाटलांना पुन्हा उमेदवारी दिल्यास आडकाठी येईल असं बोललं जात आहे. या मतदारसंघाचा निर्णय शरद पवार घेणार असल्यामुळे उमेेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS