राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला !

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे पारोळ्याचे आमदार डॉ. सतिश पाटील यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय. पाटील हे काल दुपारी साडेतीनच्या सुमारास पारोळ्याहून जळगावला एका लग्नासाठी येत होते. तेंव्हा रस्त्यात एका ठिकाणी दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी हल्ला केला. आमदार पाटील हे पुढे ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते. तर मागे त्यांचा अंगरक्षक आणि पीए बसले होते. या हल्ल्यात गाडीची काच फुटली. मात्र कोणीही जखमी झाले नाही.

हल्लेखोरांपैकी पुढील तरुणाने हेल्मेट घातले होते. तर मागे बसलेल्या तरुणाने आपला चेहरा कपड्याने झाकलेला होता. त्यामुळे हल्लेखोर कोण हे कळू शकले नाही. गाडीमध्ये सुरक्षारक्षक दिसताच त्यांनी धूम ठोकली. आमदार पाटील यांनी यानंतर या प्रकरणाची माहिती तातडीने जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिली. आता परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस हल्लेखोरांचा शोघध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा हल्ला पुर्वनियोजत असल्याचा आरोप डॉ. पाटील यांनी दैनिक लोकमतशी बोलताना केला आहे.

COMMENTS