मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शी विधनसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप सोपल यांनी त्यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या चित्ते पिंपळ या गावी जाऊन दिलीप सोपल यांनी राजीनामा सोपवला आहे.
उद्या ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. दिलीप सोपल लवकरच शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता बार्शीचे ज्येष्ठ आमदार दिलीप सोपल यांनीही शिवसेना प्रवेशाचा निर्णय घोषित केला आहे. आमदार सोपल हे २००४ सालचा अपवाद वगळून १९८५ सालापासून विधानसभेवर प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. आता ते आगामी बार्शी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. परंतु या मतदारसंघातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी सोपल यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेणार ते पाहण गरजेचं आहे.
COMMENTS