मुंबई – राष्ट्रवादीच्या आमदारानं पूरग्रस्तांना पक्षामार्फत मदत न करता थेट मुख्यमंत्र्यांकडे निधी दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे आणि सोलापूरचे जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी शिंदे बंधूंनी सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांसाठीचा मदतनिधी मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे दोन्ही नेते राष्ट्रवादीपासून दुरावले असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: पूरग्रस्तांसाठी सांगली-कोल्हापूरमध्ये तळ ठोकून असताना शिंदे बंधूंनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन मदतनिधी दिला आहे. संजयमामा शिंदे यांनी 11 लाख तर माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे यांनी 10 लाख रुपये पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच सुपूर्द केला आहे. या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा मदतनिधी थेट त्यांच्याकडे दिल्यामुळे आगामी काळा हे दोन्ही नेते भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही शिंदे बंधू राष्ट्रवादीपासून दुरावले असल्याचं दिसत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून इच्छूक उमेदवारांच्या घेण्यात आलेल्या मुलाखतीलाही आमदार बबन शिंदे गैरहजर होते. तेव्हापासूनच बबनदादा शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. त्यानंतर आता मदतनिधीचं निमित्त साधत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.
COMMENTS