सातारा – राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या गाडीला रविवारी अपघात झाला होता. या अपघातात आमदार शिंदे किरकोळ जखमी झाले असून आंधारी फाटा (ता. जावळी) याठिकाणी ही घटना घडली. दरीच्या टोकावरुन जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला हा अपघात झाला. परंतु दरीच्या कडेला असलेल्या झाडांमध्ये गाडी अडकली आणि त्याचवेळी आमदारांनी गाडीतून उडी मारल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या दुर्घटनेनंतर शशिकांत शिंदे यांनी ट्वीट केलं असून मी सुखरुप आहे काळजी करण्याचं कारण नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील शेवटचे गाव असणाऱ्या रामेघर येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले होते. त्या कार्यक्रमास जात असताना एक अपघात झाला, परंतु मी सुखरूप आहे, काळजी करण्याचे कारण नाही…
— Shashikant Shinde (@shindespeaks) March 4, 2018
आमदार शशिकांत शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील शेवटचं गाव असलेल्या रामेघर इथं नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच सत्कार सोहळा आणि शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाला जात होते. या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र अंधारी फाट्याजवळील एका वळणावर रस्त्यावरील बारीक खडीवरुन, गाडीचं चाक घसरलं. गाडीचा वेग जास्त असल्याने, ब्रेक दाबूनही गाडीवर नियंत्रण मिळवता आलं नाही. त्यामुळे आमदार शिंदे ज्या बाजूला बसले होते, ती बाजू दरीच्या दिशेने गेली. मात्र त्याचवेळी दरीच्या टोकावर असलेल्या दोन झाडांच्यामध्ये ही गाडी अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
COMMENTS