मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वतः आढावा घेणार आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणा-या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा,त्याचबरोबर विधानसभा रणनितीवर चर्चा होणार आहे. तर दुपारी पक्षाची बैठक होणार असून त्यामध्ये आमदार, खासदार आणि निवडणूक लढलेले उमेदवार व कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठ यश मिळालं. राज्यात 48 पैकी 41 जागांवर शिवसेना भाजपला यश मिळालं. परंतु राज्यात काँग्रेसला अवघी एक तर राष्ट्रवादीला चार जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा धसका काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांनी घेतला असल्याचं दिसत आहे. काँग्रेसच्या वतीनं तर पुढील एक महिना कुणीही वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होणार नाहीत असेही जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान लोकसभेतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं उद्या बैठकीचं आयोजन केलं आहे. अवघ्या चार ते पाच महिन्यांवर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या बैठकीत विधानसभा रणनितीवर चर्चा होणार आहे.
COMMENTS