मुंबई – राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेच्या काही जागा भरावयाच्या असून त्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीनं आमदारकीची ऑफर दिली असल्याची माहिती आहे. शरद पवार यांचा निरोप घेऊन जयंत पाटील हे शेट्टी यांच्या घरी गेले होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे विधान परिषदेत निवडून जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान राजू शेट्टी यांनी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यानंतर आता राष्ट्रवादीनं त्यांना आमदारकीची ऑफर दिली आहे.त्यामुळे राष्ट्रवादीच्या ऑफरवर राजू शेट्टी सकारात्मक निर्णय घेतील अशी शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या ऑफरबाबत दोन दिवसात आपण निर्णय घेऊ, असे राजू शेट्टी यांनी म्हटल्याची माहिती आहे.
१२ सदस्य राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर जाणार
राज्य मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या नावांची नियुक्ती राज्यपाल विधान परिषदेवर करतात. सध्या सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे १२ सदस्य राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांचे प्रत्येकी चार जणांची निवड याद्वारे विधानपरिषदेवर केली जाण्याची शक्यता आहे.
या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात
काँग्रेसचे हुस्नबानू खलिफे, जनार्दन चांदुरकर, आनंदराव पाटील, रामहरी रुपनवर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, ख्वाजा बेग, जगन्नाथ शिंदे यांचा कार्यकाळ ६ जून रोजी संपला आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टी – प्रा. जोगेंद्र कवाडे आणि काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांचा कार्यकाळ १५ जून रोजी संपत आहे. राष्ट्रवादीचे राज्यपाल नियुक्त सदस्य राहुल नार्वेकर यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला व पुढे ते विधानसभेचे सदस्य झाले. राष्ट्रवादीचे अन्य एक आमदार रामराव वडकुते यांनीही पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या सदस्यांच्या जागेवर आता लवकरच नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
COMMENTS