पुणे – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होत असलेल्या व एमआयटी पुणे यांनी उभारलेल्या घुमटात इतर अनेक पुतळे आहेत, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही.त्यामुळे छत्रपतींच्या भूमीतच छत्रपतींना बेदखल करण्याची हिंमत कशी करता, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी विचारला आहे.
लवांडे म्हणाले, मंगळवारी 2 ऑक्टोबर रोजी लोणी काळभोर, पुणे येथे एमआयटी ने उभारलेल्या व जगातील सर्वात मोठा घुमट म्हणून गाजावाजा सुरु असलेल्या घुमटात जगभरातील 54 संत, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ यांचे पुतळे उभारले आहेत. जगातील सर्वश्रेष्ठ व आदर्श राजे, सर्वधर्मसमभाव शिकविणारे, लोकशाहीची बीजे रोवणारे, विज्ञान व तंत्रज्ञान यांची सांगड घालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही. ज्या ऋषीमुनींच्या अस्तित्वाबद्दल संशय आहे त्यांचे पुतळे आहेत, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही. छत्रपतींना डावलण्याचा नेमका हेतू काय?
यासंदर्भात शासनाची भूमिका काय आहे, याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा. तुम्हाला छत्रपतींचं तत्वज्ञान आवडलं नाही की, फडणवीस व कराड हे संघाच्या विचारधारेचे आहेत म्हणून असं करण्यात आलं? एमआयटीने याची दखल घेवून तत्काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा. तसेच या चुकीबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी, असेही लवांडे म्हणाले.
त्यामुळे लोणी काळभोर येथील एमआयटी संस्थेच्या कार्यक्रमास ग्रामस्थांनी विरोध केला आहे. जगातील सर्वात मोठ्या डोममध्ये जगभरातील विचारवंत , महान पुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. मात्र त्यात शिवाजी महाराजांचा पुतळा नाही. याला ग्रामस्थांचा आक्षेप आहे. त्यामुळे जिथे राजा नाही तिथे प्रजा नाही. अशी भुमिका घेत ग्रामस्थांनी उद्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील अशीच भुमिका घेत ग्रामस्थांना पाठिंबा दीला आहे.
COMMENTS