मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. शरद पवारांनी याबाबतची घोषणा केली असून राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. गेली काही दिवसांपासून आघाडीत या मतदारसंघातील उमेदवारीवरुन तिढा सुरु होता. परंतु हा तिढा आज अखेर सुटला असल्याचं दिसत आहे.
राणा जगजितसिंह पाटील हे उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते राष्ट्रवादीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्षही आहेत. तर डॉ पाटील यांच्या सून अर्चनाताई पाटील या उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आहेत. त्यामुळे हा या परिवाराचा बालेकिल्ला आहे. डॉ पाटील यांच्यावर विरोधक राजकीय घराणेशाहीचा आरोप करीत असले तरी त्यांच्यामागे जनाधार असल्याने याचा विचार करुनच पवारांनी राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात शिवसेनेनं ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर असा सामना रंगणार आहे.
माढ्यातून संजय शिंदेंना उमेदवारी
दरम्यान माढ्यातून संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून संजय शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. भाजपसह इतर सहयोगी पक्षाचा शिंदेंना पाठिंबा आहे.संजय शिंदे हे मोहिते पाटील कुटुंबीयांचे कट्टर विरोधक असून, अजित पवारांचे कट्टर समर्थक आहेत.
COMMENTS