बीड, परळी वै. – राज्यातील जुलमी राजवट उलथवुन टाकुन शिवस्वराज्य आणण्याचा संकल्प करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवनेरी येथुन सुरू केलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे उद्या शुक्रवार दि.23 ऑगस्ट रोजी परळी शहरात आगमन होत आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्यात या यात्रेचे अभुतपूर्व स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले असून, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अभिनेते तथा खा.अमोल कोल्हे आणि घरचेच असणारे लाडके नेते धनंजय मुंडे व मान्यवरांचे स्वागत भव्य मोटार सायकल रॅलीने करण्यात येणार आहे.
दि.06 ऑगस्ट रोजी शिवनेरी येथुन सुरू झालेली ही शिवस्वराज्य यात्रा राज्याच्या अनेक जिल्ह्यांमधून मार्ग क्रमण करीत उद्या शुक्रवार दि.23 ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यात येत आहे. या यात्रेचा बीड जिल्ह्यात 3 दिवस मुक्काम राहणार असून, जिल्ह्यातील सहा ही मतदार संघात रॅलीचे अभुतपूर्व स्वागत करण्यात येणार आहे.
उद्या शुक्रवारी सायंकाळी 05 वाजता धर्मापूरी रोड येथुन परळीत आगमन होणार असून, धर्मापूरी रोड येथुन दुचाकी मोटार सायकल रॅलीने या शिवस्वराज्य यात्रेचे परळी शहरात स्वागत करण्यात येणार आहे. गंगाखेड फाटा, औष्णिक विद्युत केंद्र वसाहत गेट, ईटके कॉर्नर, उड्डाणपुल, नांदेड टी हाऊस, टॉवर मार्गे मोंढा मैदानावर या रॅलीचे आगमन झाल्यानंतर तेथे जाहीर सभा होणार आहे. रॅलीच्या स्वागतासाठी संपुर्ण शहरात डिजिटल बॅनर्स, पोस्टर्स, स्वागत कमानी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंडे आणि पताकांनी संपुर्ण शहर सजवण्यात आले आहे. तत्पुर्वी दुपारी 03 वाजता शिवाजी चौक येथुन ही रॅली धर्मापूरी रोड येथे स्वागतासाठी जाणार आहे.
सायंकाळी 07 वाजता होणार्या या जाहीर सभेस माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत संभाजी राजेंची भूमिका साकार करणारे खा.अमोल कोल्हे, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी व पक्षाचे इतर पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. बीड जिल्ह्यातील माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, माजी आ.अमरसिंह पंडित, उषाताई दराडे, सय्यद सलीम,माजी आ.राजेंद्र जगताप सुनिल धांडे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, शिक्षक आ.विक्रम काळे, बाळासाहेब आजबे, सतिश शिंदे, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, युवक नेते संदिप क्षीरसागर, अक्षयभैय्या मुंदडा, महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती पानसंबळ, महेंद्र गर्जे, रामकृष्ण बांगर, दत्ताआबा पाटील यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शिवस्वराज्य यात्रेला संपुर्ण यात्रेत प्रचंड प्रतिसाद मिळत असून, यात्रे दरम्यानची सर्वात मोठी सभा आणि रॅली परळी शहरात होईल असा विश्वास स्थानिक पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे. सभेसाठी वॉटरप्रुफ मंडपाची सोय करण्यात आली आहे. मान्यवरांचा परळी शहरात उद्या शुक्रवारी रात्री मुक्काम राहणार असून, त्यानंतर यात्रा अंबाजोगाई कडे शनिवारी सकाळी प्रस्थान करणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.
COMMENTS