अहमदनगर – अगामी विधानसभा निवडणूक
कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे लढवणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे रोहित पवार यांची या मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.
अशातच रोहित पवार यांनी भाजपला जोरदार धक्का दिला आहे.
कर्जत तालुक्यातील दुधोडी येथील भाजपचे पदाधिकारी, सरपंच आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे दुधोडीचे अध्यक्ष संतोष कोराळे, सरंपच राजेंद्र परकाळे, बाळासाहेब भोसले, अमोल हरीभाऊ, राजेंद्र जांभळे, नाना कोराळे यांच्यासह बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय भिसे आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपला मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान मतदारसंघात नवे पर्व सुरू झालं असून अनेकजण पक्षात येत आहेत, तसेच येणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. कर्जत तालुक्यातील अनेक मुलींना शिक्षणासाठी नऊ किलोमीटर पर्यंत पायी शाळेत जावं लागतं. शनिवारी लवकर शाळा सुटल्यावर टेम्पोला लटकून घरी यावं लागते. हाच विकास आहे का? आम्ही पाण्यासाठी चारी खोदून देतो म्हटल्यावर पालकमंत्र्यांनी धावपळ करून चारी खोदण्यास सुरूवात केली असं म्हणतही रोहित पवारांनी भाजपमंत्री राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
COMMENTS