आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या डोक्यावर भाजपची छत्री, राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत!

आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या डोक्यावर भाजपची छत्री, राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत!

सातारा – साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार
शिवेंद्रराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला दांडी मारली होती. तसेच त्यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी अर्ज देखील केलेला नाही. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. शिवेंद्रराजेंचं घराणं स्थापनेपासून राष्ट्रवादीसोबत आहे. मागील सलग तीन टर्म शिवेंद्रराजे साता-यातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. परंतु ते गेली काही दिवसांपासून पक्षावर नाराज असून ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशाबाबत आज सातारा शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थिती बैठक झाली. यात भाजपात प्रवेशाचा सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्यांच्या विचारांचाच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगत भाजपा प्रवेशाच्या चर्चेस दुजोरा दिला. सातारा शहरातील समर्थकांचे मत जाणून घेण्यासाठी सुरूची बंगल्यावर त्यांनी बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा बॅंकेचे संचालक प्रकाश बडेकर, प्रकाश गवळी, नासीर शेख, अशोक मोने, अॅड. डी. आय. एस. मुल्ला, रामभाऊ साठे, हेमंत कासार यासह पालिकेतील नगरविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या डोक्यावर भाजपची छत्री दिसत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यानं त्यांच्या डोक्यावर भाजपची छत्री पकडली असुन यावर भाजपचं कमळ दिसत आहे. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते पण समयसूचकता राखून असतात असेच दिसतंय. पाऊस लागू नये म्हणून का, आगामी वाटचाल दिसावी म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या डोक्यावर भाजपाचीच छत्री धरली असावी असाही अंदाज माडला जात आहे.

दरम्यान साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नाराजीवर राष्ट्रवादीने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सातारच्या दोन राजांमध्ये समझोता करणार आहेत. शिवेंद्रसिंहराजे यांची पवार समजूत काढून त्यांचे मन वळविणार असल्याची चर्चा आहे. परंतु शिवेंद्रसिंहराजे यांच्या डोक्यावर भाजपची छत्री दिसत असल्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसत आहे. त्यामुळे पवार शिवेंद्रसिंहराजेंची समजूत काढण्यात यशस्वी ठरतील का? हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS