लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेला राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार शिवसेनेत प्रवेश करणार ?

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेला राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार शिवसेनेत प्रवेश करणार ?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते शिवसेना, भाजपच्या वाटेवर आहेत. काही नेत्यांनी शिवसेनेत आणि भाजपमध्ये प्रवेश देखील केला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील मोठा नेता शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहेत.

दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी आज शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट घेतली आहे. या भेटीमुळे ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश करतील असं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणमधून राधाकृष्ण विखेंचे पुत्र डॉ. सुजय विखे यांच्याविरोधात आमदार जगताप यांनी निवडणूक लढवली होती. परंतु या निवडणुकीत सुजय विखे यांनी दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीदरम्यान काँग्रेसनं आमचं अजिबात काम केलं नसल्याचा आरोप जगतापांनी केला होता. निवडणुकीनंतर घेण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीला देखील जगताप यांनी दांडी मारली होती. तेंव्हापासूनच ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. परंतु आज त्यांनी एकनाथ शिंदे यांचीच भेट घेतल्यामुळे ते शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

COMMENTS