पुणे – सत्ता स्थापन करण्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. शिवसेनेकडून सत्ता स्थापन करण्यासाठी चाचपणी सुरु आहे. शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच पुण्यात काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांचे एकत्रित बॅनर लागल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेचा दावा करणार असल्याचंही बोललं जात आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडमोडींना वेग आला आहे. सद्यस्थिती सर्वांचे लक्ष राज्यपालांच्या भूमिकेकडे लागलं आहे. परंतु यापूर्वीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांचे एकत्रित बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पुण्यातील कोंढावा परिसरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या तिन्ही नेत्यांचे एकत्र फोटो असलेला बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्रातील पावरबाज जनतेने, संघर्षातील आदेश स्वीकारला आहे. बळीराजाच्या मनातील अन् हातातील घड्याळाच्या अचूक वेळेन, धनुष्यातील अचूक वेधाने जनता राजा स्वीकारावा… असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेचा दावा करणार असल्याचंही बोललं जात आहे.
COMMENTS