मुंबई – गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या शासकीय निवासस्थानाजवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं आज आंदोलन केलं आहे.या आंदोलनात राष्ट्रवादीनं गृहनिर्माण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश मेहतांच्या मलबार हिल येथील निवासस्थानी धडक देत राजीनाम्याची मागणी केली आहे.एमपी मिल कंपाऊंड एसआरए प्रकरणात गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी मेहतांविरोधात आक्रमक झाली असून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणबाजी केली आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
मुंबईच्या ताडदेव मधील एम.पी. मिल कंपाऊंड येथील एस आर. ए. प्रकल्पात विकासकाच्या फायद्यासाठी नियम डावलून विकासकाला एफ.एस.आय. अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांवर आहे. याप्रकरणी लोकायुक्त एम. एल. तहलियानी यांच्यामार्फत करण्यात आलेल्या या चौकशीत मेहता यांनी मंत्री म्हणून आपली जबाबदारी निष्पक्ष पार पाडली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
मेहतांनी राजीनामा द्यावा- धनंजय मुंडे
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला असून मेहता यांचा हा घोटाळा आम्ही विधान परिषदेत बाहेर काढला होता, त्यावेळेस अनेक दिवस आम्ही सभागृह चालू दिले नाही, त्यांच्या राजीनाम्याची तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशीची मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी लोकायुक्तांकडून चौकशी करू असे सांगितले होते. मुख्यमंत्री नेहमीच क्लीन चीट देण्याचे काम करतात, लोकायुक्तांनी ठेवलेला ठपका पाहता आपण केलेले आरोप योग्यच होते, त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनाची नाही तर मनाची ठेवुन मेहतांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
COMMENTS