गडचिरोली – तेलंगाणामध्ये विधानसभा बरखास्त केल्यानंतर तिथे आता निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. तेलंगाणा राष्ट्रसमितीचे सर्वेसर्वा आणि मावळते मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रय़त्न करत आहेत. त्यांच्याकडून सत्ता खेचण्यासाठी काँग्रेस आणि इतर पक्ष प्रयत्न करत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसही आता तेलंगाणातील निवडणूक लढवणार आहे. पक्षाचे तेलंगाणा आणि आंधप्रदेश प्रभारी धर्मराव बाबा अत्राम यांनी ही माहिती दिली आहे. लोकसभेच्या 17 आणि विधानसभेच्या 119 जागा लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
धर्मराव बाबा अत्राम यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आंध्रप्रदेश आणि तेलंगाणाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा विधानसभेचा मतदारसंघ अहेरी हा तेलंगाणाच्या सीमेवर आहे. त्यांना तेलगू बोलता येतं. त्यामुळे त्यांच्याकडे या दोन राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर विरोधकांच्या ऐक्याचं काय ? असा प्रश्न या निमित्ताने उभा राहत आहे. शरद पवार यांनीच विरोधकांच्या ऐक्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे त्यांचाच पक्ष स्वबळाची भाषा कसा करु शकतो असा प्रश्न केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची एवढ्या जागा लवढवण्याची ताकद आहे का ? की केवळ आघाडी करुन जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रय़त्न आहे हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
COMMENTS