राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आता अपात्रतेची कारवाई?

राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आता अपात्रतेची कारवाई?

उस्मानाबाद – पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान राणाजगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेल्यानंतर जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांनी उघडपणे भाजपचं काम केलं होतं. यासंदर्भातील फोटो तसेच व्हिडिओ शूटिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती.

नेताजी पाटील

दरम्यान आता दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी मोठी चुरस आहे, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असतानाही अप्रत्यक्षरीत्या भाजपच्या अजेंड्याखाली काम करत असल्याचे दिसून येत आहेत. विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील यांच्यावर कारवाई केली आहे. इतर अनेक जिल्हा परिषद सदशांनी अशा प्रकारच्या कारवाया केल्या आहेत. त्यामुळे या दोघावरच कारवाई कशासाठी? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याकडून विचारला जात आहे.

इतर काही सदस्यांना का अभय दिले जाते? इतर अनेक सदस्य गळ्यात गमज्या टाकून उघडपणे फिरत होते. मात्र दोघांवर कारवाई करून इतरांना मोकाट सोडले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून बोलून दाखवली जात आहे. दोघावरील कारवाई अपेक्षित असली तरी अन्य सदस्यांवरही कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता इतर सदस्यांवर कारवाई होणार का? ज्या सदस्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला आहे अशा सदस्याचे सदस्य अपात्र करणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

COMMENTS