नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात आज महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर होण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी चेहऱ्याला संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे.आजच्या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांसह इतरही काही नेते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशभरात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसला राज्यात केवळ एक जागा मिळवता आली. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने नांदेड आणि हिंगोली या जागा जिंकल्या होत्या, त्या जागा राखण्यातही काँग्रेसला अपयश आलं. त्यामुळे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत तरी चांगलं यश मिळावं यासााठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे. त्यामुळे पक्षांतर्गत बदल केले जाणार असल्याची चर्चा आहे.
लोकसभेतील पराभवानंतर अशोक चव्हाण यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता. त्यांच्यासह काँग्रेसच्या इतर प्रदेशाध्यक्षांनीही राजीनामे दिले होते. पण अशोक चव्हाण यांचा राजीनामा अजून स्वीकारण्यात आला नव्हता. परंतु आज तो स्वीकारला जाईल असं बोललं जात आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS