मुंबई – अजूनही धोका टळलेला नाही, आता दोन दिवसांपासून नाईट कर्फ्यू सुरू झाला आहे. यावर अनेकांनी प्रश्न विचारले की, हा करोना काय रात्रीच मोकाट सुटतो व दिवसा घरात बसतो काय? तसं नाही, शेवटी एक छोटीशी जाणीव जनतेला करून देण्याची आवश्यकता असते. अजूनही आपल्याला बंधनांची आवश्यकता आहे. दिवसा लॉकडाउन आपण करू शकत नाही, तशी वेळ नाही आणि आपल्यावर तशी वेळ देखील येऊ नये. निदान रात्रीची संचारबंदी आहे म्हटल्यावर एक धोक्याची जाणीव असते, असे मत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले.
कोविड योद्धा म्हणून इलेक्ट्रानिक मीडियामधील पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ठाकरे म्हणाले, अनावश्यक गर्दी टाळणं हे फार महत्वाचं आहे. मास्का वापर, हात धुणे व सुरक्षित अंतर ठेवणे हे जर का आपण पाळलं, तर मला असं वाटतं आपण या संकटावर मात करू शकतो. लढण्यासाठी आतातरी आपल्याकडे मास्क हेच एकमेव आयुध आहे. तसेच, हात धुणे व अंतर ठेवणे हे देखील महत्वाचे आहे. कारण, वॅक्सीनचा अजूनही काहीच पत्ता नाही. आपण सर्वजण सोबत आहोत. आपली साथ महत्वाची आहे आणि हा आत्मविश्वास लोकांचा मनात जागवणं गरजेचं आहे. असेही ठाकरे यांनी सांगितले.
COMMENTS