पुणे महापालिकेमुळे माझी बदनामी –नितीन गडकरी

पुणे महापालिकेमुळे माझी बदनामी –नितीन गडकरी

पुणे – पुणे महापालिकेमुळे माझी बदनामी होत असल्याचं वक्तव्य केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. चांदणी चौकातील उड्डाण पुलासाठी केंद्राकडून निधी दिला आहे, उड्डाण पुलाचा आराखडा तयार असून कामासाठी ठेकेदार तयार आहे, परंतु महापालिकेने भूसंपादन केले नसल्याने काम अद्यापही सुरू झालं नसल्यामुळे माझी बदनामी होत असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन २७ ऑगस्ट २०१७ रोजी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. पुलाचे काम सहा महिन्यांत सुरू केले जाईल, असं आश्वासन त्यावेळी गडकरी यांनी दिले होते, मात्र  अद्यापही काम सुरू झालं नसल्यामुळे गडकरी यांच्यावर टीका केली जात आहे. त्यामुळे त्यांनी पुणे महापालिकेमुळे माझी बदनामी होत असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान चांदणी चौकातील उड्डाण पुलासाठी तातडीने भूसंपादन करण्याचे आदेशही गडकरी यांनी दिले आहेत. चांदणी चौकात होणाऱ्या वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेकडून उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाचे काम सुरू झाल्यानंतर पर्यायी रस्त्यासाठी अडथळा ठरणाऱ्या जागा ताब्यात घेण्याचे काम महापालिकेकडून केले जाणार आहे. उड्डाण पुलाच्या कामासाठी पंधरा हेक्टर जागेची आवश्यकता असून त्यातील सात हेक्टर जागा बीडीपीतील आहे. इतर जागांवर ८८ घरे, दोन इमारती आणि एक बंगला अशी सुमारे शंभर रहिवासी घरे आहेत. भूसंपादनापोटी रोख मोबदला देण्यासाठी दीडशे कोटींची आवश्यकता असल्याचा अंदाज पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. ही जागा रस्त्यासाठी घेतली जाणार असल्याने जागेपोटी टीडीआर देण्याची तरतूद आहे. मात्र, घरांचा आकार लहान असल्याने आणि नागरिक टीडीआर घेऊन काय करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत गडकरी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्यासह आमदार, खासदार आणि संबंधित विभागांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

 

COMMENTS