मुंबई : शिवसेना आणि भाजपमधील युती तुटल्यानंतर व राज्यात नवीन राजकीय समीकरणे उदयाला आल्यानंतर या दोन्ही पक्षांत टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहेत. त्यात गुरुवारी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मुंबईत शिवसेनेचे दोन नेत्यांची भेट घेऊन गुप्तगू केल्याने चर्चेला उधाण आले आहे. मात्र, गडकरींनी ही भेट व्यक्तिगत होती. कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.
मेट्रो कारशेट, राज्यपाल नियुक्त सदस्य नेमणूक आणि औरंगाबाद नामांतर या मुद्दांवर राज्यात भाजपचे नेते शिवसेनेवर व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सातत्याने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षीय राजकारणापलीकडे मैत्री जपणारा दिलखुलास नेता अशी ओळख असलेल्या गडकरी यांनी मुंबई दौऱ्यात वेळात वेळ काढून शिवसेनेच्या दोन प्रमुख नेत्यांची आवर्जून भेट घेतली. यामध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या दोन्ही नेत्यांशी चर्चा केली. त्यामुळे बैठकीपेक्षा याच भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली.
गडकरी यांनी आज सकाळी माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. जोशी यांना नमस्कार करत गडकरी यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. मनोहर जोशी यांची भेट घेतल्यानंतर सायंकाळी गडकरी यांनी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या.
या भेटीसंदर्भात गडकरी म्हणाले, “मी मनोहर जोशींसोबत काम केलं होतं. अनेक दिवसांपासून भेटणं प्रलंबित होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्याने त्यांच्याकडे आज गेलो होतो. त्यांच्या पत्नीचा देहांत झाला होता, पण त्यावेळी कोव्हीडमुळे येऊ शकलो नाही. म्हणून आज व्यक्तिगत भेट घेतली. उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबीयांशी वैयक्तीक संबंध आहेत. आज वैयक्तीक चर्चा झाली. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण होते. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.”
COMMENTS