उर्जा मंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवलं,  रस्त्यावर ठिय्या आंदोलन ! VIDEO

उर्जा मंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवलं, रस्त्यावर ठिय्या आंदोलन ! VIDEO

मुंबई – उर्जामंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेशातील आझमगड येथे पोलिसांनी अडवलं आहे. त्यांना बांसा येथे जाण्यास परवानगी नाकारली आहे. बांसा येथे दलित सरपंचाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी नितीन राऊत उत्तर प्रदेशात गेले आहेत. परंतु उत्तरप्रदेशातील आझमगड येथे पोलिसांनी त्यांना अडवलं आहे.

उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगड येथील बांसा गाव येथील दलित सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील दलितांच्या या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली आहे. यासाठी या विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. मात्र दौऱ्यावर असताना आझमगडच्या बॉर्डर वर उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी नितीन राऊत यांना रोखलं आहे.

डॉ. नितीन राऊत हे आझमगड सीमेवर आल्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. आपल्याला बांसा इथे जायचं आहे, असं राऊतांनी पोलिसांना सांगितलं. परंतु बांसामध्ये जाण्याची कोणालाही परवानगी नाही, त्यामुळे तुम्हाला तिथे जाता येणार नाही, असं पोलिसांनी त्यांना सांगितलं. पोलिसांनी अडवल्यानंतर नितीन राऊत यांनी तिथेच रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. नितीन राऊत यांच्यासह कार्यकर्ते रस्त्यावर ठिय्या मांडून आहेत.

दरम्यान यावेळी राऊत यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमध्ये अनुसूचीत जातीतील लोकांवर अन्याय, अत्याच्यार केले जात आहेत. एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार जेंव्हापासून योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले आहेत. तेंव्हापासून युपीत दलितांवरील अन्याय वाढले असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

COMMENTS