नितीन राऊतांच्या प्रमोशनचे संकेत

नितीन राऊतांच्या प्रमोशनचे संकेत

मुंबईः विधानसभेच्या अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची एकत्र भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. नवीन फेर बदलात नितीन राऊत यांच्याकडे विधानसभा अध्यक्ष किंवा उपमुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे.

राज्यात महाविकास आघाडी स्थापन होत असताना तिन्ही पक्षांनी समान कार्यक्रमावर सरकार स्थापन केले. यामध्ये मुख्यमंत्री पद शिवसेनेला, उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादी आणि विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळाले. मात्र, एक वर्षाचा कारभार पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादीच सरकार चालवत असल्याचे दिसून येत आहे. धोरणात्मक निर्णयामध्ये काँग्रेसला साईडट्क केले जात असल्याने काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बदलला. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी पटोलेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.
काँग्रेसकडील खात्यात फेरबदल झाल्यानंतर राज्य सरकारमध्येही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. नाना पटोले आणि नितीन राऊत यांची सोनिया गांधी व राहुल गांधीसोबत झालेल्या बैठकीनंतर नितीन राऊत यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर, नितीन राऊतांचे उर्जामंत्री पद नाना पटोले यांच्याकडे सोपवण्यात येणार, असल्याची चर्चा आहे. मात्र, नितीन राऊत उपमुख्यमंत्री झाल्यास त्यांच्याकडे कोणतं खातं देण्यात येईल यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाहीये.

नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदासोबतच मंत्रिमंडळातही आपला सहभाग असावा, अशी अपेक्षा श्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. त्यानुसार सध्याच्या मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या ज्या मंत्र्याची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार आहे, त्या मंत्र्याकडचे खाते पटोलेंकडे जाणार, असेही जवळपास स्पष्ट झाले आहे. हे फेरबदल करीत असताना जातीय समिकरण आणि पक्षांतर्गत गटांना समान वाटा हे मुद्दा ग्राह्य धरला जाणार आहे.

COMMENTS