परवानगी नसलेल्या बीजी 3 कापूस बियाण्यांच्या विक्रीवर तातडीने प्रतिबंध आणावा,कृषिमंत्र्यांचे निर्देश

परवानगी नसलेल्या बीजी 3 कापूस बियाण्यांच्या विक्रीवर तातडीने प्रतिबंध आणावा,कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई-  तृणनाशक जीनचा (हर्बिसाईड टोलरंट) समावेश असलेल्या बिजी 3 नावाने वेगवेगळ्या कंपन्या कापूस बियाणांची विक्री राज्यात विनापरवाना करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर तातडीने प्रतिबंध करण्यासाठी राज्यातील बायोटेक्नॉलॉजीस्ट समन्वय समितीची बैठक घेण्याचे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिले.

देशात बिजी 1 आणि बिजी 2 या प्रमाणित बियाणांच्या विक्रीसाठी केंद्र शासनाने परवानगी दिलेली आहे.  मात्र काही कंपन्या वेगवेगळे ब्रॅण्डनेम वापरून तृणनाशक गुणधर्म असलेले बिजी 3 कापसाचे बियाणे परवाना नसताना विक्री करीत आहेत.

महाराष्ट्राबरोबरच गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा यासारख्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये अशाप्रकारची विक्री होत आहे. केंद्रीय कापूस संशोधन केंद्राने काही नमुने तपासल्यावर ते पॉझिटिव्ह आढळून आले आहे. याबाबतची माहिती घेऊन अशा विनापरवाना बियाणे विक्रीवर  तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी  बैठक घ्यावी. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्यस्तरीय बायोटेक्नॉलॉजी समन्वय समितीची बैठक तातडीने आयोजित करावी,असे निर्देश कृषिमंत्र्यांनी विभागाच्या प्रधान सचिवांना दिले.

या हर्बीसाईड टोलरंट बियाण्यांचे सामाजिक, शारिरीक व कृषी क्षेत्रावर होणारे दुष्परिणामांचा अभ्यास न करता विक्री होत आहेत ही गंभीर बाब असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

 

COMMENTS