मुंबई- शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांसह विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांशी मोट बांधली जावी. तसेच संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) अध्यक्षपद पवारांकडे देण्यात येईल, अशी जोरदार चर्चा गुरुवारी राजकीय वर्तुळात होती. मात्र असा कोणताही प्रस्ताव नसल्याचा खुलासा सायंकाळी स्वत: शरद पवार यांनी केला आहे.
राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे, असे सातत्याने सांगणाऱ्या शरद पवार यांनी नंतर शिवसेना-काँग्रेससोबत आघाडी बनवून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्याच धर्तीवर आता यूपीए अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाल्यावर पवारांनी नेतृत्वाचा प्रस्ताव नाही, असे सांगितले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवारांच्या यूपीए नेतृत्वाच्या वृत्ताचे खंडन केले. साहेब दिल्लीत गेले की अशा चर्चा नेहमी होतात, असे ते म्हणाले. तर यूपीएचे अध्यक्षपद हा सध्या विषय नाही, असे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पवार यांच्या यूपीए अध्यक्षपदाबाबत राज्यातील काँग्रेस नेते बोलण्यास तयार नाहीत.
शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद देण्याचा यूपीएमधील घटक पक्षांमध्ये असा कुठलाच प्रस्ताव नाही. तसेच अशी कुठली चर्चादेखील झालेली नाही. केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरोधात चालू असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी या निराधार बातम्या पेरल्या आहेत, असा खुलासा प्रदेश काँग्रेसने गुरुवारी सायंकाळी केला.
COMMENTS