नाशिक – नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत तुफान गोंधळ पहायला मिळाला आहे. भाजपचे नगरसेवक वगळता सर्वपक्षीय नेत्यांनी हा गोंधळ घातला आहे. निधी वाटपात महापौर पक्षपातीपणा करतात, महिला बालकल्याण खात्याच्या निधीचा वापर भाजपाचे नगरसेवक असलेल्या प्रभागात केला जातो. इतर पक्षांच्या नगरसेवकांच्या निधीला कात्री लावली जाते. या कारणावरून संतप्त झालेल्या शिवसेना, मनसे आणि आघाडीच्या नगरसेवकांनी महानगरपालिका सभागृहात जोरदार राडा केला होता. शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे, दिपक दातीर, नयना गांगुर्डे, सुनिल गोडसे या नगरसेवकांनी महापौरांच्या डायसकडे धाव घेत राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्वपक्षिय नगरसेवकांनी भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडलं होतं.
दरम्यान विकास कांमावरून तसेच नगरसेवक निधीवरून गेल्या काही महिन्यांपासून भाजपा-सेनेत वादविवाद सुरू असून आज सकाळी महासभेला प्रारंभ होताच वादाची खदखद उफाळून आली असल्याचं पहावयास मिळालं आहे. महापौर आणि स्थायीच्या अध्यक्षा महिला असूनही महिला बालकल्याण खात्याला पुरेसा निधी का मिळत नाही. मिळतो तोही निधी इतर कामांसाठी का वळविला जातो, असा सवाल सेना नगरसेविका नयना गांगुर्डे यांनी करत महापौरांना धारेवर धरले होते. विकास कामांसदर्भात महापौर पक्षपाती करतात, असा आरोप विरोधकांनी सुरू केल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं असल्याचं पहायला मिळालं आहे.
COMMENTS